पार्श्वभूमी
१९९० च्या दरम्यान (राजकीय व्यंगचित्रकार म्हणून काम करत असताना) जेव्हा शरद शर्मा यांनी कार्टूनच्या माध्यमातून राजस्थान येथे साक्षरता अभियानला सुरुवात केली. या व्यंगचित्राच्याव्दारे साक्षरता अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे हे साक्षरता अभियान वाढवण्यास त्यांना प्रोत्साहन मिळाले.वॉलपोस्टरच्या माध्यमातून कमी पैशामध्ये पटकन जास्तीतजास्त माहिती देण्याचे काम त्यांनी केले. सुरुवातीला त्यांनी वर्तमानपत्राच्या पानाएवढे चित्रकाढून ते लोकांना दाखवायला लागले व या पोस्टरमध्ये लोकांच्या आवडीचे, जिव्हाळ्याचे विषय असल्याने ते लोकांना आवड़ू लागले. याची लोकप्रियता लवकरच वाढू लागल्याने त्यांनी यातील चित्रांसोबत काही वाक्यसुध्दा देण्यास सुरुवात केली. आणि अशा प्रकारे ग्रासरुटस् कॉमिक्सच्या कार्यशाळांमध्ये लोकांचा प्रतिसाद वाढायला लागला. कमी वेळात लोक चित्र काढायला तर शिकतच होते त्याच बरोबर आपली गोष्ट त्यांना चित्राच्यामाध्यमातून सांगण्याचे कौशल्य प्राप्त होत होते.
लवकरच हे तंत्र विकसीत करणा-या कार्यशाळांचे आयोजन भारताच्या पश्चिम, उत्तर तसेच पूर्वीय राज्यातील काही संस्था, संघटनांसोबत करण्यात आले. भारतला अनेक प्रकारच्या कथा सांगणा-या संस्कृतीचा वारसा असल्यामुळे ग्रासरुटस् कॉमिक्सची कल्पना संपूर्ण भारतात काही वर्षातच पोहचली.
९ वर्षाच्या प्रायोगिक आणि व्यावसायिक अनुभवानंतर हे कार्याची पध्दती तसेच तंत्र संपूर्ण जगात पोहचवण्यासाठी एका संस्थेची निर्मिती झाली.
वर्ल्ड कॉमिक्स इंडीया (WCI) या संस्थेची स्थापना झाली. WCI च्या माध्यमातून व्यंगचित्र काढणारे कलाकार, पत्रकार, विद्यार्थी या सर्वांनी मिळून त्या कॉमिक्सचा वापर लोकांना माहिती देण्यासाठी करायला लागले. जे लोक अगदी खेड्यापाड्यात रहात होते आणि त्यांच्याकडे शिक्षणाचा व माहितीचा अभाव होता अशा ठिकाणी या व्यंगचित्रांव्दारे माहिती पोहचविली जाऊ लागली आणि याच कार्टूनच्या माध्यमातून लोकांचे आवाज व जनसामान्यांचे आवाज शासनापर्यंत पोहचवले जाऊ लागले. याचा फायदा NGO ने घेऊन जनसामान्यांपर्यंत माहिती आणि माहितीचा अधिकार याबद्दल लोकांना प्रशिक्षण दिले आणि त्यांनी विविध प्रकारचे हे प्रशिक्षण वर्ग सुध्दा लोकांसाठी सुरु केले.
ग्रासरुटस् कॉमिक्स
ग्रासरुट्स कॉमिक्सचा वापर भाषेच्या पलिकडे जाऊन केला जाऊ लागला. ज्या लोकांना लिहीता वाचता येत नव्हते ते चित्राच्या माध्यमातून गोष्ट समजून घेऊ लागले. कॉमिक्समुळे लोकशिक्षणाचे नवीन मार्ग उपलब्ध झाले. कॉमिक्सच्या माध्यमातून सोप्या शब्दात कमी खर्चात लोकांना माहिती दिली जाऊ लागली आणि त्यामुळे लोकांमध्ये चर्चा होऊ लागली. यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासास मदत व्हायला लागली. याचे महत्वाचे अंग म्हणजे काळापेन, पेपर आणि तुम्हाला काय सांगायचे आहे ते महत्वाचे शब्द एवढेच होय. ग्रासरुटस् कॉमिक्स या माध्यमाचा वापर केवळ लोक शिक्षणासाठी न होता औद्योगिक संस्थापण याचा वापर करु लागल्या. अशा प्रकारचे कॉमिक्स किंवा त्याव्दारे काढलेली चित्रे गावात बसस्टॉपवर, दूकानांवर, शाळेच्या भिंतीवर, घरांच्या भिंतीवर, विजेच्या खांबांवर, झाडांवर, पारावर इ. लोकगर्दीच्या ठिकाणी माहितीचे साधन म्हणून चिटकवले जाऊ लागली. त्यामुळे येणा-या जाणा-यांचे लक्ष सहज वेधले जाऊ लागले.
या माध्यमाचा वापर केवळ भारतातच नव्हे तर इतर देश सुध्दा करत आहेत. यात अफ्रिका, लॅटीन अमेरिका, मिडल इस्ट, युरोप, पाकिस्तान, नेपाळ, लेबनन, फिनलंड इत्यादी देश आहेत
.
ग्रासरुटस् कॉमिक्स चळवळ
ग्रासरुटस् कॉमिक्सया माध्यमाचा वापर दूर्गम खेड्यापाड्यात आणि समाजामध्ये माहिती, ज्ञान मिळवण्यासाठी होतो. यासाठी कमी खर्च आहे आणि कुठल्याही क्षेत्रात याचा वापर होऊ शकतो.
याचा सर्वात जास्त वापर NGO च्या माध्यमातून लोकांना तांत्रीक शिक्षणाबरोबर आरोग्य, सेवा, हक्क, मोर्चा, आंदोलन, चळवळ, माहितीचा अधिकार इ. साठी पण होऊ लागला आहे. भारतात NGO बरोबर शासकिय विभाग या माध्यमाचा उपयोग प्रगतिशील भारत बनवण्यासाठी करत आहेत.
या माध्यमाचा उपयोग भारता बाहेर तंझनिया, ब्राझिल, लेबनन, यु.के., फिनलंड, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका या देशांनी सुध्दा याचा वापर केला. WCI आणि WCIMC या संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मोठमोठ्या कार्यशाळा आयोजित करुन तसेच प्रदर्शन आयोजित करुन लोकांना याचे प्रशिक्षण दिले व माहिती पुरवीली.